२३ ऑगस्ट २०२६ :बाबा हरदेव सिंह जी यांचा दिव्य संदेश
.पैठण तालुका प्रतिनिधी
“प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहेत” हा केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश नसून, मानवी चेतना निर्मळ ठेवण्यास आणि निसर्गाप्रती जबाबदार बनण्यास प्रेरणा देणारा संदेश आहे. याच प्रेरणेतून संत निरंकारी मिशन आपल्या पर्यावरण संरक्षणाच्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या उपक्रमाच्या माध्यमातून हरित, संतुलित आणि शाश्वत भविष्याच्या निर्मितीसाठी सातत्याने समर्पित भावनेने कार्यरत आहे.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाने आज देशव्यापी जनचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. या अभियानाचा उद्देश केवळ वृक्षारोपण करणे नसून, निसर्गासोबतचे आत्मीय नाते पुन्हा दृढ करणे, पर्यावरण संरक्षणाला जीवनमूल्य म्हणून स्थापित करणे तसेच भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ आणि संतुलित पृथ्वीची निर्मिती करणे हा आहे. कालांतराने या अभियानाचा विस्तार होत असून, देशभरातील लाखो नागरिकांना निसर्गाप्रती संवेदनशील होण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजा जी यांनी माहिती देताना सांगितले की, भारतातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ३५० वृक्ष समूह स्थापित करण्यात आले आहेत. तसेच ६०० हून अधिक ‘वननेस वन’ स्थळांवर श्रद्धाळू आणि सेवादलाचे स्वयंसेवक पूर्ण समर्पणाने या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत. हे अभियान केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून, समाजामध्ये निसर्गाप्रती जागरूकता, संवेदनशीलता, पर्यावरणीय जबाबदारी आणि सामूहिक सहभागाची संस्कृती अधिक दृढ करण्याचे कार्यही करीत आहे.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांना पुढे नेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवार, २३ ऑगस्ट रोजी या महाअभियानाच्या सहाव्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. देशभरातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील ६३० ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने मिशनच्या लाखो श्रद्धाळू आणि स्वयंसेवकांनी समर्पित भावनेने सहभागी होत सुमारे १० लाख रोपांची लागवड केली
पैठण येथे जिल्हा परिषद मुलांची शालेव्या परिसरातील मैदानालगतच्या मोकळ्या जागे मध्ये 401 वृक्षारोपण करण्यातआले. यासाठी पैठण शाखेचे मुखी पुंजाराम कोरडे सेवादल संचालक बद्रीनाथ घटे शाळेचे मुख्याध्यापक अंकुशरावजी गाढे त्यांचे सहकारी समशेर पठाण अनेक मान्यवर शिक्षक वृंद तसेच न्यायालयाचे विधी तज्ञ हेही उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व वृक्ष लागवडीचे महत्त्वअविनाश केथा यांनी केले .त्यांनी आलेल्या सर्वच मान्यवरांचे आभार मानले.सिमरन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढविण्यासोबतच हरित आणि निरोगी भविष्याच्या निर्मितीच्या दिशेने हे व्यापक अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे मिशन केवळ रोपे लावण्यापुरती आपली जबाबदारी मर्यादित ठेवत नाही, तर ती रोपे वृक्ष होईपर्यंत त्यांचे सातत्याने संरक्षण करण्याचा संकल्पही पूर्ण करते. प्रत्येक रोपाची तीन ते पाच वर्षे नियमित देखभाल केली जाणार आहे, जेणेकरून त्यांची योग्य वाढ होऊन ते घनदाट लघुवनांचे स्वरूप धारण करतील, जैवविविधता समृद्ध करतील, स्थानिक परिसंस्थेला बळकटी देतील आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व हरित वातावरण उपलब्ध करून देतील.
आज संपूर्ण जग हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास अशा गंभीर आव्हानांना सामोरे जात असताना, संत निरंकारी मिशनचा हा हरित संकल्प प्रत्येक नागरिकाला निसर्गासोबत सहअस्तित्वाचा संदेश देतो. हे अभियान आपल्याला स्मरण “`करून देते की पृथ्वी ही केवळ आपली वारसा संपत्ती नाही, तर भावी पिढ्यांप्रती असलेली आपली“` सामूहिक जबाबदारी आहे.
