शस्त्रक्रियेमुळे २२ चिमुकल्यांना मिळाला नवा आत्मविश्वास.

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर आणि पंचायत समिती, पाथर्डी (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टंगटाय शस्त्रक्रिया शिबिरात गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या २२ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
ग्रामीण रुग्णालय, पाथर्डी येथे झालेल्या या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. महावीर कटारिया यांनी शस्त्रक्रिया पार पाडल्या. सेवा संकल्प अभियानांतर्गत (१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर) ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्यात आले होते. संबंधित विद्यार्थ्यांची बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी भरती करून आवश्यक तपासण्या करण्यात आल्या होत्या.
या वेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सचिन राख, विस्तार अधिकारी तथा शालेय पोषण अधीक्षक श्री रामनाथ कराड, व सर्व विशेष शिक्षक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि पालकांना मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी समावेशित शिक्षण अंतर्गत पालक व विद्यार्थी यांना प्रवास भत्ता वाटप करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बोलताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला व आत्मविश्वासाला चालना मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मोफत व दर्जेदार आरोग्य सेवेबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.
पालकांनी आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि अशा मोफत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सचिन राख यांनी केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी विषय शिक्षक नोडल अधिकारी श्री राहुल अकोलकर, सहायक नोडल अधिकारी श्री लाड, विशेष शिक्षक विशाल टिपरे, श्रीनिवास राजळे, कचरे , रवी डाळींबकर यांनी परिश्रम घेतले.