ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रामदेवबाबा विद्यापीठ, नागपूर येथील NVIDIAच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘एआय सेंटर ऑफ कॉम्पिटन्सी’चे उदघाटन करण्यात आले.
              शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची गरज नाही, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
                मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था म्हणून रामदेवबाबा विद्यापीठाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणाच्या मूळ उद्देशांशी स्वतःला जोडून ठेवत व्यापारीकरणापासून दूर राहण्याचे कार्य या संस्थेने केले आहे. खासगी संस्था असूनही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये तिचा समावेश होतो. आज या संस्थेचे विद्यापीठात रुपांतर झाले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात तसेच शिक्षणाला नवा आकार देणाऱ्या देशातील अत्यंत नामांकित विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचा समावेश होईल. 
         कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकॉन आणि क्वांटम कम्प्युटिंग तंत्रज्ञान हे या शतकाच्या भविष्याला आकार देणारे प्रमुख घटक ठरणार आहेत. ज्या प्रचंड वेगाने तंत्रज्ञान तसेच व्यवसायाचे स्वरूप बदलत आहे, ते लक्षात घेता आपल्या शैक्षणिक संस्थांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. क्वांटम कम्प्युटिंगमुळे संशोधन प्रक्रियेला अभूतपूर्व गती मिळाली आहे.  बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या 1000 दिवसांत नोकऱ्यांच्या क्षेत्रातील सुमारे 70% नोकऱ्यांचे स्वरूप आमूलाग्र बदलणार आहे. नोकऱ्या कमी होणार नाहीत, मात्र त्यांचे स्वरूप निश्चितच बदलेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हा बदल अटळ आहे. त्यामुळे जग ज्या वेगाने बदलत आहे, त्या वेगाशी सुसंगत राहण्यासाठी आपल्या शिक्षण संस्थांनाही शिक्षणाच्या पद्धतीत बदल करावे लागतील.
                           कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) आरोग्यसेवा आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडत असून, ‘महाविस्तार’सारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना स्मार्ट मार्गदर्शन, उत्पादन खर्चात घट आणि उत्पादकतेत वाढ साध्य होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
           आज कोणतेही क्षेत्र एका चौकटीत राहिलेले नाही, अभियांत्रिकी असो, बायोटेक्नॉलॉजी असो किंवा इतर कोणतीही शाखा, आता स्वतंत्रपणे शिक्षण घेऊन चालणार नाही. बहुविषयक दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज बनली आहे. जगाचा इतिहास पाहिला तर मोठ्या नवकल्पना उद्योगक्षेत्रातून नव्हे, तर विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधूनच उदयास आल्या आहेत. आज तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, त्यांची वाटचालही एखाद्या विद्यापीठातून किंवा संशोधन संस्थेतूनच सुरू झाली आहे. त्यामुळे ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि नावीन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. रामदेव बाबा विद्यापीठही या परंपरेला अधिक बळकट करत देशातील संशोधन आणि नवोन्मेषाला नवी दिशा देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
           या वेळी सत्यनारायण नुवाल, रामदेवबाबा विद्यापीठ, नागपूरचे कुलपती डॉ. शंकर मंथा, कुलगुरू डॉ. राजेश पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *