
पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचा शुभारंभ माणिकदौंडी येथून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात दि.१२ ऑगस्ट रोजी करण्यात आला. जन्मोत्सव प्रारंभ रथाचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, कार्यकारणी सदस्य संपतलाल गांधी, श्री रत्न जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम मरकड, आश्रम शाळा मुख्याध्यापक शंकर राठोड, अधीक्षक सदानंद सुतार, माणिकदौंडी सरपंच शायदभाई पठाण,उपसरपंच समीर पठाण, सदस्य बाळासाहेब कांबळे, संपत गायकवाड, गौतम पटवा, पोलीस पाटील वसंत वाघमारे, शिवाजीराव मोहिते पाटील, विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी आकर्षक व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेत लेझीम पथक, झांज पथक, टिपरी पथक, काठी पथक तसेच कलशधारी मुली सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेतील मुला-मुलींच्या कलाविष्काराने आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला.
शोभायात्रेतील विविध पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कलशधारी मुलींची आकर्षक उपस्थिती तसेच लेझीम, झांज व टिपरी पथकांच्या तालबद्ध सादरीकरणामुळे शोभायात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविक, नागरिक तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात माणिकदौंडी येथून जन्मोत्सवाची सुरुवात झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
श्री आनंद रथयात्रेतील लेझीम, झांज, टिपरी, लाठीकाठी, कलश पथकांचे तालबद्ध आणि देखणे सादरीकरण होण्यासाठी श्री रत्न जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची मेहनत घेतली.
