ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

 

विठूनामाच्या गजराने महाविद्यालय परिसर दुमदुमला. 

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
महाराष्ट्राच्या समाजसंस्कृतीत पंढरीच्या वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात लाखो वारकरी पंढरीची पायी वारी करतात. पंढरीचा विठ्ठल वारकऱ्यांचे आराध्यदैवत तर वारी ही वारकऱ्यांची उपासना पद्धती.

याच वारीची अनुभूती महाविद्यालयीन विद्यार्थांना व्हावी तसेच महाविद्यालयीन युवाशक्ती अध्यात्मिकतेकडे वळावी हा उद्देश ठेवून येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रेरणेने आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विठूनामाच्या गजराने व अभंगांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. अतिशय उत्साही व भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी पालखी उत्सवात सहभाग नोंदविला. या सोहळ्यासाठी विद्यार्थी तसेच प्राध्यापक वारकऱ्यांच्या पोशाखात उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कपाळावरील गोपीचंदाचा टिळा आणि हाती घेतलेल्या भगव्या पताका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. विद्यार्थिनीनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन पालखी सोहळ्याचे नेतृत्व केले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पालखीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल’ अशा जयघोषात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. वारीचे मुख्य आकर्षण असलेल्या रिंगण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व प्राध्यापकांनी फेर धरून फुगड्या खेळल्या तसेच राजरत्न डोळस यांनी सुमधुर आवाजात गायलेल्या भजनांवर ठेका धरला, ज्यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर वारीमय झाला होता. आरती जिवडे व हर्षदा जिवडे या विद्यार्थीनिनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली.
यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, विश्वस्त कुणाल आव्हाड, प्राचार्य डॉ बबन चौरे, राहुरीच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, पाथर्डी तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हेमंत नांगरे, ह भ प दादा महाराज बडे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ अशोक डोळस, डॉ वैशाली आहेर, प्रा सचिन पालवे उपस्थित होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ बबन चौरे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व आणि महाराष्ट्राची वारी परंपरा समजावून सांगितली. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची आणि संतांच्या विचारांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबवला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने पालखी सोहळ्याचे आयोजन केले.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *