ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

जनजागृती सेवा संस्थेचा उपक्रम; आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा केला सन्मान।

 बदलापूर प्रतिनिधी

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यरत आशा स्वयंसेविकांचा ‘नवदुर्गा सन्मानपत्र’ देऊन गौरव करण्यात आला. संयोग अपार्टमेंट, झेंडा चौक, बदलापूर पश्चिम येथे हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

समता साहित्य अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा राष्ट्रपती पदक सन्मानित दिलीप नारकर आणि जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना आकर्षक पेन, गुलाबपुष्प आणि ‘नवदुर्गा सन्मानपत्र’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी दिलीप नारकर यांनी आरोग्य विभागातील शासन निर्णय, आशा स्वयंसेविकांच्या विविध मागण्या आणि त्यांच्या प्रश्नांबाबत शासनाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. आशा स्वयंसेविकांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करताना, शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यास कायदेशीर मार्गाने संघर्ष कसा करावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी जनजागृती सेवा संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या आगामी वाटचालीविषयी माहिती दिली. ज्येष्ठ आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळातील अनुभव कथन केले. आशा स्वयंसेविका ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. माता-बाल आरोग्य, आरोग्यविषयक जनजागृती आणि शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या काळात संस्थेच्या वतीने ऑनलाइन पद्धतीनेही महिलांना ई-‘नवदुर्गा सन्मानपत्र’ पाठविण्यात आले. महिलांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *