
मुंबई, प्रतिनिधी
हज-२०२७ यात्रेसाठी वैद्यकीय तपासणी व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या अनुषंगाने काही अनधिकृत लिंक समाजमाध्यमे तसेच व्हॉट्सॲपद्वारे प्रसारित होत असल्याचे महाराष्ट्र राज्य हज समितीच्या निदर्शनास आले आहे. या लिंक समितीकडून अधिकृतरीत्या प्रसारित करण्यात आलेल्या नसून अनधिकृत आहेत. त्यामुळे यात्रेकरूंनी अशा लिंकवर वैयक्तिक, ओळखविषयक अथवा वैद्यकीय माहिती भरू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य हज समितीने केले आहे.
हज-२०२७ साठी निवड झालेल्या यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालयांमार्फत करण्यात येणार आहे. संबंधित यात्रेकरूंचे कव्हर क्रमांक व नावे संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक तसेच शासकीय आरोग्य यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित शासकीय रुग्णालयामार्फत वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळावर माहिती भरण्याची आवश्यकता नाही.
अनधिकृत संकेतस्थळांवर माहिती भरल्यास माहितीची गळती, गोपनीयतेचा भंग, माहितीचा गैरवापर तसेच आर्थिक अथवा सायबर फसवणुकीचा धोका संभवतो. त्यामुळे कोणत्याही लिंकचा वापर करण्यापूर्वी तिची अधिकृतता व विश्वासार्हता पडताळून पाहावी, असे समितीने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील हज यात्रेकरूंच्या वैद्यकीय तपासणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये तसेच अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. संबंधित रुग्णालयांची यादी व तपासणीची सविस्तर माहिती व्यवस्था निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येईल.
हज-२०२७ संदर्भातील अधिकृत माहिती व सूचनांसाठी महाराष्ट्र राज्य हज समितीशीच संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.