
-
रेखा पालवे~गायकवाड,उपसंपादक,
विभागीय माहिती कार्यालय,छत्रपती संभाजीनगर
भारतीय जनगणना ही देशात दर दहा वर्षांनी केली जाणारी अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय व सांख्यिकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाची सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक माहिती संकलित केली जाते. यामध्ये वय, लिंग, साक्षरता, व्यवसाय, धर्म, राहणीमान आदी बाबींचा समावेश असतो. या संकलित माहितीच्या आधारे शासन देशाच्या प्रगतीचा अभ्यास करते आणि भविष्यातील धोरणे आखते. तसेच शाळा, रुग्णालये, दळणवळण व्यवस्था यांसारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन, बजेटचे वाटप आणि लोकसंख्येच्या आधारावर निवडणूक मतदारसंघांची पुनर्रचना यासाठी जनगणनेची अचूक आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरते.
स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना सन 1951 मध्ये झाली. त्यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना होत असून, शेवटची 15 वी जनगणना 2011 मध्ये पार पडली. 2021 मध्ये होणारी 16 वी जनगणना कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही जनगणना 2027 मध्ये होणार आहे.
महाराष्ट्रात या जनगणनेची सुरुवात महाराष्ट्र दिन, 1 मे 2026 पासून करण्यात आली आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे—
घर यादी व घर गणना लोकसंख्या गणना यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात 1 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरांची माहिती संकलित केली जात आहे. नागरिकांना 1 ते 15 मे 2026 दरम्यान अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in� वर स्व-नोंदणी (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य घर व उपलब्ध सुविधांची माहिती ऑनलाइन भरू शकतो.
स्व-नोंदणी करताना एका कुटुंबासाठी एकच मोबाईल क्रमांक वापरता येईल. कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही. एकूण 33 प्रश्नांची अचूक माहिती भरावी लागेल आणि कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
माहिती सबमिट केल्यानंतर ‘H’ ने सुरू होणारा 11 अंकी युनिक आयडी (SE ID) मिळतो. पुढे प्रगणक घरी भेट दिल्यानंतर या आयडीची पडताळणी केली जाईल. त्यामुळे हा आयडी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
स्व-नोंदणी ऐच्छिक असली तरी, 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रशिक्षित प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन माहिती संकलित करतील. नागरिकांनी प्रगणकांना अचूक व खरी माहिती देणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा अर्जांपासून सावध राहावे आणि वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.
दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना होणार असून, मार्च 2027 पासून ही अधिकृत लोकसंख्या मानली जाईल.
संकलित माहिती सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांसह सुरक्षित सरकारी सर्व्हरमध्ये संग्रहित केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्व-नोंदणी करून किंवा प्रगणकांना अचूक माहिती देऊन शासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.
अचूक माहितीमुळे विकासाच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि देश व राज्याच्या विकासाला चालना मिळते. याच पार्श्वभूमीवर यावेळचे घोषवाक्य “आमची जनगणना, आमचा विकास” अधिक अर्थपूर्ण ठरते.
टीप: अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in ला द्यावी.
रेखा