ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

पैठण तालुका प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील कडेठाण खुर्द (गेवराई मर्दा ग्रुप ग्रामपंचायत) येथील नवजात बालकाची दफ्तरी नोंद न घेता खोट्या माहितीच्या आधारे दिशाभूल करणे आणि पालकांचा मानसिक व आर्थिक छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी दोषी कडेठाण खुर्दच्या ग्रामसेवीका सौ. मनीषा ठोंबरे व अंगणवाडी सेविका यांच्यावर शिस्तभंगाची व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी  मागणी श्री. शिवनाथ भास्कर दौंड यांनी पैठणचे गट विकास अधिकारी  आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी  यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार शिवनाथ दौंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मार्च २०२६ रोजी त्यांच्या मुलाचा जन्म झाला. जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यानुसार बालकाच्या जन्माची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी करून जन्म दाखला मिळण्यासाठी त्यांनी दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी डिस्चार्ज कार्ड व आवश्यक कागदपत्रांसह ग्रामसेवक सौ. मनीषा ठोंबरे यांच्याकडे रीतसर अर्ज देऊन पोहोच पावती प्राप्त केली होती.
त्यानंतर दि. १२ जून २०२६ रोजी दौंड हे दाखला घेण्यासाठी गेले असता, ग्रामसेवकांनी दफ्तरी कोणतीही नोंद घेतली नसल्याचे सांगत “तुमच्या मुलाचा जन्म आडुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्याची माहिती अंगणवाडी सेविका यांनी दिली आहे,” असे सांगून दाखला देण्यास टाळाटाळ केली व त्यांना आडुळ प्राथमिक आरोग्य केंद्रा कडे पाठवले.
आरोग्य केंद्राच्या पत्राने पोलखोल:
ग्रामसेवकांनी दिलेल्या पत्रावरून शिवनाथ दौंड यांनी दि. १३ जून २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, आडुळ येथे जाऊन चौकशी केली असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देत “सौ. मनीषा शिवनाथ दौंड (महिला वय 35)यांची प्रसूती या केंद्रात झालेलीच नाही” असे स्पष्ट केले. यावरून ग्रामसेवक व अंगणवाडी सेविकेने संगनमत करून चुकीची माहिती देत शासकीय दफ्तरात हेराफेरी केल्याचे व नागरिकांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.
ग्रामसेवक व अंगणवाडी सेविकेच्या या मनमानी कारभारामुळे संबंधित बालकाच्या पालकांना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे.

त्यामुळे जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांन्वये दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,ग्रामसेवक सौ. मनीषा ठोंबरे यांच्यावर निलंबनाची व शिस्तभंगाची कारवाई व्हावी, बालकाची जन्म नोंद दफ्तरी घेऊन तात्काळ जन्म दाखला देण्यात यावा,अशा मागण्यांचे तक्रार अर्ज विकास अधिकारी  पैठण, बाल विकास प्रकल्प अधिकारी पैठण, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

————————————————-

पंचायत समिती  गट विकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. 

———————————————

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *