महावितरणवर धडकला सर्वपक्षीय भव्य मोर्चा..!
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी अनिल राठोड
महावितरणचे कथित ‘स्मार्ट’ मीटर आणि सातत्याने येणाऱ्या भरमसाठ वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. या त्रासाच्या विरोधात आज सर्वपक्षीय ढाणकी शहर बंदची हाक देण्यात आली होती.
या आवाहनाला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. बंदनंतर संतप्त नागरिकांचा एक भव्य महामोर्चा महावितरण कार्यालयावर धडकला, ज्यामुळे काही काळ परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते.
गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट मीटरच्या तांत्रिक त्रुटी आणि अव्वाच्या सव्वा येणाऱ्या वीज बिलांमुळे ढाणकीकर नागरिक कमालीचे हवालदिल झाले आहेत. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आज सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने ‘ढाणकी बंद’ पुकारण्यात आला. शहरातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. दुपारपर्यंत शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा आणि व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.
सर्वपक्षीय नेते आणि हजारो नागरिकांचा जनसमुदाय ढाणकी येथील आठवडी बाजार परिसरात एकत्र आला. तेथून निघालेला हा भव्य जनआक्रोश मोर्चा महावितरण कार्यालयाकडे रवाना झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकारी व गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आंदोलनाद्वारे स्मार्ट मीटर सक्ती बंद करा, शहरात स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ बंद करण्यात यावे.वीज ग्राहकांना मे महिन्यात कोणत्या आधारावर मनमानी २५० युनिट लावण्यात आले, याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. वीज ग्राहकांचे आलेले अव्वाच्या सव्वा जादा वीज बिल तात्काळ रद्द करण्यात यावे. ढाणकी शहरातील विद्युत वाहिनीचे आणि खांबाच्या डीपीचे (DP) तात्काळ मेंटेनन्स करण्यात यावे. मुख्यालयी हजर न राहणाऱ्या आणि कार्यालयात वेळेवर न येणाऱ्या महावितरणचे अभियंता राहुल नाखले यांची तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. जमादार गंगाधर गिते यांची राजकीय हेतूने पोलीस स्टेशन बिटरगाव येथून करण्यात आलेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
या भव्य दिव्य महामोर्चाचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, नगरपंचायतचे उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, मनसेचे तालुकाप्रमुख सादिक शेख, आझाद समाज पक्षाचे जिल्हाप्रमुख जॉन्टी उर्फ प्रशांत विनकरे भाजपाचे ढाणकी शहर अध्यक्ष तथा नगरसेवक उमेश योगेवार, शिवसेना उभाठाचे शहर प्रमुख सुंदर कांता वासमवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सय्यद माजीद, काँग्रेसचे शहर अध्यक्ष गजानन मिटकरे, युवासेना तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर, माजी उपनगराध्यक्ष जहीर भाई, खरेदी विक्री संघाचे गणेश नरवाडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संबोधि गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष मंतेवाड, काँग्रेस व्यापारी आघाडीचे रुपेश भंडारी, माजी काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल तुपेकर, एम आय एम चे शेख बशीर, मुकुंद जोशी, किशोर ठाकूर, बाबुराव नरवाडे, सय्यद खालीद, तय्यब सर यांनी संयुक्तपणे केले. वाढीव वीज बिलांचा प्रश्न सुटत नाही आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबत नाही, तोपर्यंत जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.