ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

तुमचे मत महत्त्वाचे… पसंतीक्रम नोंदवा अचूक !

शब्दांकन – संजीवनी जाधव पाटील,

लोकशाहीच्या बळकटीकरणात प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण असते. मतदानाचा हक्क बजावताना आपले मत योग्य पद्धतीने नोंदविले जावे आणि ते वैध ठरावे, यासाठी मतदान प्रक्रियेची माहिती असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये पसंतीक्रमानुसार मतदान करण्यात येणार आहे. सर्वसाधारण निवडणुकीतील मतदान पद्धतीपेक्षा ही पद्धत वेगळी असल्याने मतदारांनी पसंतीक्रम नोंदविण्याचे नियम समजून घेणे गरजेचे आहे.तर जाणून घेऊ या मतदान करतांना घ्यावयाची काळजी.

पसंतीक्रम मतदान पद्धत समजून घ्या

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवून मतदान करावयाचे असते. या पद्धतीमध्ये मतदार आपल्या सर्वाधिक पसंतीच्या उमेदवाराला प्रथम पसंती देऊ शकतो. त्यानंतर इच्छेनुसार अन्य उमेदवारांना दुसरी, तिसरी किंवा पुढील पसंती देता येते. यामुळे मतदाराला एकापेक्षा अधिक उमेदवारांबाबत आपला पसंतीक्रम व्यक्त करण्याची संधी मिळते.

प्रथम पसंतीचा ‘१’ हा अंक महत्त्वाचा

मतदान करताना मतपत्रिकेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे दिलेली असतात. त्यासमोरील ‘पसंतीक्रम’ (Order of Preference) या स्तंभात मतदाराने आपल्या सर्वाधिक पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक लिहावा.

निवडणुकीत कितीही उमेदवार असले, तरी मतदाराने किमान एका उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक नोंदविणे आवश्यक आहे. प्रथम पसंती नोंदविल्याशिवाय मतपत्रिका वैध ठरत नाही. त्यामुळे प्रथम पसंती नोंदविताना विशेष दक्षता घ्यावी.

दुसरी, तिसरी पसंती देण्याचीही मुभा

प्रथम पसंती नोंदविल्यानंतर मतदाराला इतर उमेदवारांनाही पसंती द्यावयाची असल्यास संबंधित उमेदवारांच्या नावासमोर अनुक्रमे ‘२’, ‘३’, ‘४’ असे अंक नोंदविता येतात. निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देण्याची मुभा आहे. मात्र, दुसरी किंवा त्यापुढील पसंती नोंदविणे बंधनकारक नाही.

मतदाराने एका उमेदवाराच्या नावासमोर एकच अंक लिहावा. तसेच एकच पसंतीक्रम एकापेक्षा अधिक उमेदवारांना देऊ नये. उदाहरणार्थ, एका उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक लिहिल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर पुन्हा ‘१’ हा अंक लिहू नये.

पसंतीक्रम अंकांतच नोंदवा

मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविताना अंकांचाच वापर करावा. ‘एक’, ‘दोन’, ‘तीन’ अशा शब्दांमध्ये पसंतीक्रम लिहू नये.

पसंतीक्रम नोंदविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपातील भारतीय अंक (१, २, ३ इत्यादी), रोमन अंक (I, II, III इत्यादी) किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंक वापरता येतात. मात्र, मतदारांनी पसंतीक्रम स्पष्ट आणि नियमानुसार नोंदवावा.

जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करा

मतदान केंद्रावर मतदानासाठी विशेष जांभळ्या रंगाचा स्केच पेन उपलब्ध करून दिला जाणार आहे. मतदारांनी पसंतीक्रम नोंदविण्यासाठी याच पेनचा वापर करावा. स्वतःजवळील पेन, पेन्सिल किंवा बॉलपेनचा वापर करू नये. मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या अधिकृत स्केच पेनचा वापर करणे आवश्यक आहे.

मतपत्रिका अवैध ठरणार नाही, याची काळजी घ्या

मतदान करताना मतपत्रिकेवर पसंतीक्रमाव्यतिरिक्त कोणतीही अनावश्यक खूण करू नये. मतपत्रिकेवर स्वतःची स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा कोणताही शब्द लिहू नये. तसेच अंगठ्याचा ठसाही उमटवू नये.

उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम दर्शविण्यासाठी टिक (✓) किंवा क्रॉस (X) अशी खूण करू नये. अशा खुणा असलेली मतपत्रिका अवैध ठरू शकते. मतदारांनी पसंतीक्रमासाठी केवळ अंकांचाच वापर करावा.

प्रथम पसंती आवश्यक, पुढील पसंती ऐच्छिक

मतदाराने आपल्या पसंतीच्या कोणत्याही एका उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर अन्य उमेदवारांना पसंतीक्रम देणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला पसंतीक्रम देणे आवश्यक नाही. मतदाराने आपली निवड आणि पसंती यानुसार मतदान करावे.

सजग मतदार, सक्षम लोकशाही

मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक मतदाराने आपले मत योग्य पद्धतीने नोंदविणे आवश्यक आहे. विशेषतः पसंतीक्रम मतदान पद्धतीत नियमांचे पालन न केल्यास मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता असते.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या मतदारांनी मतदानापूर्वी पसंतीक्रम नोंदविण्याची पद्धत समजून घ्यावी. मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचा वापर करावा. आपल्या प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ हा अंक अचूक नोंदवावा. इच्छेनुसार पुढील पसंतीक्रम द्यावा आणि मतपत्रिकेवर अन्य कोणतीही खूण करणे टाळावे.

लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक मताला मोल आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावताना योग्य पद्धतीने पसंतीक्रम नोंदवून आपले मत वैध राहील, याची दक्षता घेऊया. कारण, अचूक मतदान हीच सजग मतदाराची ओळख आणि सक्षम लोकशाहीची खरी ताकद आहे.                          

 

 

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *