
पैठण तालुका प्रतिनिधी
पैठण पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. वैशाली विनोद बोंबले यांची तर उपसभापतीपदी संजय अशोक लघाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात दि.10 मार्च मंगळवार रोजी पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली.
सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कामकाज पाहिले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे एकच अर्ज दाखल झाल्याने सौ. वैशाली विनोद बोंबले यांची सभापतीपदी तर संजय अशोक लघाणे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केली.
निवडीची अधिकृत घोषणा होताच उपस्थित सदस्य व पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे, रविंद्र काळे, आप्पासाहेब निर्मळ, नंदू पठाडे, दादा बारे, काका बर्वे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रियंका भुजंग, अक्षय गवारे, सविता आडे, कासाबाई कोल्हे, नर्मदा नलावडे, अलका गोजरे, रहीबाई वाघ, उदयसेन काळे, अलका शेळके, दादासाहेब गलांडे, भरत मुकुटमल, प्रमोद पन्हाळकर, प्रदीप नरके, दत्तात्रय गायके व सखुबाई झारगड आदी सदस्यांनी नव्याने निवड झालेल्या सभापती व उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच वरिष्ठ सहाय्यक सतिष अखेगावकर, विस्तार अधिकारी बळिराम राठोड, तुपे, संजय थोरले, रवि प्रसाद इंगळे, आदी अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते. या वेळी पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि समन्वय राखत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.
सदर निवड प्रक्रिया शांततेत आणि खेमेळीच्या वातावरणात पार पडली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.