ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

हस्तकला, हातमाग,स्वदेशी उत्पादनाचे ‘सागर रिसॉर्ट ‘ मध्ये प्रदर्शन

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी

 भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ( एमएसएमई) सहकार्याने ‘शिखा’ज कारागीरी या संस्थेच्या समन्वयात ‘स्वदेश ‘फॅशन व लाईफस्टाईल एक्सपो 2026 (SWADESHI – Fashion & Lifestyle Expo 2026) या भव्य हस्तकला मेळाव्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगरात करण्यात आले आहे.

            चौदा ते सोळा ऑगस्ट 2026 दरम्यान सागर रिसॉर्ट्स येथे होणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील स्वदेशी उत्पादने, हस्तकला, हातमाग, फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांचे वैविध्य अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

            या प्रदर्शनात 100 हून अधिक पुरस्कारप्राप्त कारागीर, एमएसएमई उद्योग, स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, हातमाग व हस्तकला उत्पादक, ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ उपक्रमातील उद्योजक, सहकारी संस्था तसेच विविध लाइफस्टाइल ब्रँड सहभागी होणार आहेत.ट्रॅक्टर (TRIFED ) खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), नॅशनल ज्यूट बोर्ड यांसह केंद्र व राज्य शासनाशी संबंधित संस्थांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभणार आहे.

            भारताच्या विविध प्रांतांतील पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक उद्योजकतेचा अनोखा संगम या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.चोखंदळ ग्राहकांना शैलीदार निवडीसाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            कारागिरी म्हणजे केवळ एखादी वस्तू तयार करण्याचे कौशल्य नव्हे; तर पिढ्यान्‌पिढ्या जपलेली कला, परंपरा, कल्पकता आणि स्थानिक ज्ञानाचा अमूल्य वारसा होय. अशा देशातील विविध राज्यातील कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला व हातमाग उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, एमएसएमई आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे तसेच भारतीय स्वदेशी उत्पादनांची व्याप्ती वाढविणे, हा या प्रदर्शनामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

             ‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे हे व्यासपीठ ठरणार आहे.त्यामुळे देशभरातील कारागिरांच्या हस्तकलेला,पारंपारिक कारागिरीला चालना देण्यासाठी एकदा सागर रिसॉर्ट्सला भेट देऊन या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

             विशेष म्हणजे प्रदर्शनामुळे विविध भागांतील प्रतिभावान कारागिरांना आपली उत्पादने आणि कौशल्य मोठ्या ग्राहक वर्गासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भूमीवर साकारत असलेला हा स्वदेशीचा भव्य उत्सव कारागिरी, उद्योजकता आणि भारतीय परंपरेचे दर्शन घडविणारा ठरणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकुसर, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि उद्योजकतेची नवी ऊर्जा एकाच छताखाली अनुभवता येणार असल्याने नागरिकांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.  

 

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *