
पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री भवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळीमानूर, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथे वन महोत्सवानिमित्त “वृक्ष संवर्धन” या विषयावर चित्रकला स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री निलेश गणगले यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता तसेच प्रभावी चित्रकला सादरीकरणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व, जैवविविधतेचे संवर्धन, जलसंधारण आणि हरित पर्यावरणाचा संदेश देणारी आकर्षक व कल्पक चित्रे साकारली. विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून पर्यावरणाविषयीची जागरूकता, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली.
या उपक्रमाबद्दल राज्याचे निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष श्री प्रमोद दादा मोरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब डोंगरे, महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती लतिका ताई पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सौ. छाया ताई राजपूत तसेच जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य श्री देविदास सोनटक्के यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
विद्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली असून वन महोत्सवाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.