भुतेटाकळी | दि. १२ फेब्रुवारी
भुतेटाकळी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या मुंबई (बांद्रा) येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अजिनाथराव फुंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविक फुंदे बाळासाहेब यांनी केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे अजिनाथ फुंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, प्रामाणिक कष्ट, सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, ध्येयाप्रती पाठपुरावा, निर्व्यसनीपणा आणि नम्रता या गुणांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. तसेच विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले होते. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक पठाण आसिफ यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती फुंदे व सुवर्णा केदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन टाकळकर आजिनाथ यांनी मानले.
या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यावसायिक व माजी विद्यार्थी खंडू फुंदे, भगत अशोक, खुडे लक्ष्मण, गोडगे बंडोपंत, खेडकर अशोक, फुंदे वाल्मिक आदी मान्यवर उपस्थित होते.


