नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे तानसेन ननावरे यांना आश्वासन..!

महादू पवार.
पत्रकार,मुंबई.
नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही, असे थेट आश्वासन नाशिकचे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बोलताना दिले. शिवशक्ती भीमशक्ती युतीचे प्रणेते तानसेन ननावरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त सुनील कर्णिक यांची नाशिक मुख्यालयामध्ये भेट घेतली, त्यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना कर्णिक यांनी आश्वासन दिले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश उन्हावने यांच्यावर खोट्या गुन्हा दाखल करून त्या बाबतीतल्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्याने आंबेडकरी रिपब्लिकन कार्यकर्त्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आणि शिवशक्ती भीमशक्ती नेते तानसेन ननावरे यांच्याकडे गाऱ्हानी मांडली गेल्यानंतर त्यांनी आज तातडीने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिक मुख्यालयात भेट घेऊन नाशिक मधील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांबाबत पोलिसांचा होणारा दुजाभाव आणि राजकीय दबावतंत्र याबाबत त्यांनी आयुक्त कर्णिक यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यावेळी निवेदनही सादर करण्यात आले. आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ता हा संविधानाच्या माध्यमातून चळवळीमध्ये कार्यरत आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता त्याचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी राजकीय सूडबुद्धीने त्यांच्या विरोधामध्ये तक्रारी करून पोलीस अधिकाऱ्यांना संगनमत करून गुन्हे दाखल केले जात असल्याची गंभीर बाब तानसेन ननावरे यांनी आयुक्त कर्णिक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्त कर्णिक यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. पीआरपीचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश उन्हावने यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळताच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेऊन कार्यकर्त्यांच्याबाबत शहानिशा झाल्याशिवाय गुन्हा नोंद करू नये, अशी स्पष्ट ताकीद पोलीस अधिकाऱ्यांना दिली. राजकीय द्वेषातून अशा प्रकारच्या गुन्हे आणि तक्रारी घेताना दोन्ही बाजू तपासाव्यात असे आदेशही आयुक्त कर्णिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शिष्टमंडळाच्या समक्ष दिले. यापुढे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बाबतीत कोणताही दुजाभाव होऊ देणार नाही, असे ठाम आश्वासन आयुक्त कर्णिक यांनी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तानसेनभाई ननावरे यांच्याशी बोलताना दिले . यावेळी शिष्टमंडळामध्ये पीआरपीचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश उन्हावने , शशी उन्हवने , युआरपी सफाई कामगार महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वरभाई झंझोटड, युआरपी कोकण संपर्कप्रमुख आनंद जाधव, युआरपी चर्मकार आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष श्यामभाई वाडकर,आंबेडकरी चळवळीतील युवा नेते उद्देश सोनवणे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते..